केळ्यामध्ये फायबरबरोबरच सुक्रोस, फ्रुक्टोस व ग्लुकोज असतात. त्यामुळे केळं खाल्ल्याने तत्काळ ऊर्जा मिळते. केळ्यामधून केवळ ऊर्जाच मिळत नाही तर या फळामुळे अनेक जुनाट विकारांवर नियंत्रण मिळवता येतं. म्हणूनच दैनंदिन आहारात केळ्याचा अंतर्भाव असावा. नैराश्य आलेल्यांना केळं खाल्ल्याने बराच फरक जाणवल्याचं एका संशोधनातून दिसलं. कारण केळ्यामध्ये 'ट्रिप्टोफान' नावाचं प्रोटीन असतं ज्याचं आपल्या शरीरात 'सेरोटॉनिन'मध्ये रूपांतर होतं. या प्रोटीनमुळे मन रिलॅक्स होतं, मूड ठीक होतो व आपण नेहमी आनंदी राहतो. केळ्यामधलं 'बी६' हे जीवनसत्व रक्तातली शर्करा नियंत्रणात ठेवतं. ही शर्करेची पातळी नियंत्रणात राहिल्यास आपण नेहमी आनंदी राहतो. मुबलक लोह असणारं केळं रक्तातल्या हिमोग्लोबिन निमिर्तीस चालना देतं. त्यामुळे नियमित केळं खाल्ल्यास अनिमियावर नियंत्रण ठेवता येतं. केळ्यामध्ये भरपूर पोटॅशिअम असलं तरी मिठाचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे केळ्याच्या सेवनाने रक्तदाबावरही चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येतं. केळ्यामध्ये भरपूर फायबर असल्याने कोठा साफ ठेवण्यात या फळाची बरीच मदत मिळते. ताणतणावामुळे शरीरातली पोटॅशिअमची पातळी एकदम खालावते. अशावेळी केळं खाऊन ती पातळी पूर्ववत करता येते. केळ्याचे याहूनही अनेक फायदे आहेत. तेव्हा यापुढे केळ्याकडे दुर्लक्ष करू नका. रोजच्या आहारात त्याचा समावेश करा.
लेखन स्त्रोत:मुंबई टाईम्स.
No comments:
Post a Comment