Search This Blog

eSakal

 

स्मरणशक्‍तीसाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन

डॉ. श्री बालाजी तांबे

Friday, June 18, 2010 AT 12:15 AM (IST)

Tags: family doctor health dr. balaji tambe

अनुभवलेली, ऐकलेली गोष्ट मेंदूमध्ये साठवून ठेवण्याचे काम स्मरणशक्‍तीचे असते. मेधा, स्मृती, धृती, बुद्धी या सर्वांची कामे वेगवेगळी व ठरलेली असली तरी मुळात या चौघी प्रज्ञेच्याच वेगवेगळ्या बाजू असल्याने परस्परांशी संबंधित असतात. जीवन जगताना या चौघींचीही पदोपदी आवश्‍यकता असते आणि यांच्या संपन्नतेवरच जीवनाची यशस्विता व समाधान अवलंबून असते.
अभ्यासाच्या वयात, कोणतेही ज्ञान मिळवत असताना स्मृती, बुद्धी वगैरे भाव सर्वाधिक प्रमाणात आवश्‍यक असतात हे जरी खरे असले तरी आपण सर्वच यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. रोजच्या व्यवहारातला अगदी साधा निर्णय घ्यायचा असला तरी परिस्थिती लक्षात येण्यासाठी मेधा जबाबदार असते. या परिस्थितीत काय करायला हवे, काय करायला नको हे सांगणारी बुद्धी असते. या द्विधा मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी तिला स्मृती व धृती मदत करतात. या चौघींनी आपले काम व्यवस्थित केले आणि मनाने त्यांना पाठिंबा दिला तर अचूक निर्णय घेतला जातो. अन्यथा काही तरी चुकीचे घडते, ज्याचा दुष्परिणाम नंतर भोगावा लागतो. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी असे जे म्हटले जाते, त्यामागे मेधा, बुद्धी, स्मृती, धृती व मन यांची साखळी असते. म्हणूनच स्मरणशक्‍ती, बुद्धी वगैरेंचे काम नीट चालावे यासाठी सर्वांनीच लक्ष रहायला हवे.
स्मरण होण्यामागे काय काय कारणे असतात हे चरकसंहितेत पुढीलप्रमाणे सांगितलेले आहे,
वक्ष्यन्ते कारणान्यष्टौ स्मृतिर्यैरुपजायते ।
निमित्तरूपग्रहणात्‌ सादृश्‍यात्‌ सविपर्ययात्‌ ।।
सत्त्वानुबन्धात्‌ अभ्यासात्‌ ज्ञानयोगेन पुनः श्रुतात्‌ ।
दृष्टश्रुतानुभूतानां स्मरणात्‌ स्मृतिरुच्यते ।।...चरक शारीरस्थान
निमित्तग्रहण -
निमित्त म्हणजे कारण. कारणावरून स्मृती होते. उदा. गुलाबाचे फूल पाहून त्याचा सुगंध आठवतो.
रूपग्रहण - आकार, रूपामध्ये साम्य असल्याने त्याच्याचसारखी दुसरी गोष्ट आठवते. उदा. कवठ किंवा बेलाचे फळ पाहिल्यास चेंडूची आठवण येते. वनतुळशी बघितल्याने दारातील तुळस आठवते.
सादृश्‍य - दोन गोष्टीत साम्य असल्याने एक गोष्ट पाहिली असता पूर्वी अनुभवलेली दुसरी गोष्ट आठवते. उदा. मोगऱ्याच्या वास आला की मोगऱ्याचा गजरा डोळ्यासमोर येतो.
विपर्यय - दोन गोष्टीत अत्यंत विरोधाभास असल्यास एक पाहिल्यास दुसरी आठवते. उदा. एखादे ओसाड माळरान पाहिल्यास पूर्वी अनुभवलेली हिरवळ आठवते.
सत्त्वानुबन्धात्‌ - सत्त्व म्हणजे मन. एखादी गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे असा मनाचा आग्रह असल्यास स्मरण होते. उदा. उद्या अमुक व्यक्तीचा वाढदिवस आहे ही जाणीव मनात असेल तर स्मरण होते.
अभ्यास - एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करत राहिल्यास ती कायम स्मरणात राहते. उदा. तेच तेच टेलिफोनचे नंबर वारंवार वापरल्याने लक्षात राहतात.
ज्ञानयोग - परमज्ञानाच्या प्राप्तीने सर्व काही स्मरण होते. हे आध्यात्मिक प्रगतीमुळे साध्य होऊ शकते.
पुनः श्रुतात्‌ - पूर्वी अनुभवलेल्या ज्ञानाचा एखादा अंश ऐकला, पाहिला तरी संपूर्ण ज्ञान स्मरते. उदा. पूर्वी पाहिलेल्या बर्फाच्या शिखरांचा एक फोटो जरी पाहिला तरी संपूर्ण सहल आठवते किंवा पूर्वी पाठ केलेल्या कवितेच्या दोन ओळी ऐकल्या की पूर्ण कविता आठवते. याचा एक गूढ अर्थ असाही होऊ शकतो की पूर्वजन्मातील ज्ञान या जन्मात थोडासा अभ्यास केला तरी पूर्ण आठवते.
आयुर्वेदानुसार स्मरणशक्‍ती, बुद्धी, मेधा या सर्वांचेच कार्य नीट चालण्यासाठी प्रयत्न करता येतात. त्या दृष्टीने आयुर्वेदाने आहार-औषधेही सुचवलेली आहेत. त्यातली काही महत्त्वाची द्रव्ये आपण पाहू.
गाईचे दूध - अतिपथ्यं कान्तिबुद्धिप्रज्ञामेधाकफप्रदम्‌ ।
...निघण्टु रत्नाकर

गाईचे दूध बुद्धी, मेधा व प्रज्ञाप्रद असते.
घरचे ताजे लोणी - अग्निदीप्तिकरं वृष्यं मेधाकृच्च प्रियं मतम्‌ ।
...निघण्टु रत्नाकर

लोणी मेधावर्धक असते.
- साजूक तूप
.............वृष्यं मेधाकरं मतम्‌ ।
बुद्धिप्रदं शुक्रलं य...............।।...निघण्टु रत्नाकर
साजूक तूप मेधा, बुद्धी यांच्यासाठी हितकर असते,
- -  च विशदं वृष्यं रुचिकरं मतम्‌ ।...निघण्टु रत्नाकर
मध मेधावर्धक असते.
डाळिंब - कषायानुरसं ग्राहि स्निग्धं मेधाबलावहम्‌ ।
...निघण्टु रत्नाकर

डाळिंब मेधावर्धक असते.
औषधांमध्येही ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामांसी, हिरडा, निर्गुडी, ज्येष्ठमध, ज्योतिष्मती, गोरखमुंडी, वेखंड, शतावरी वगैरे वनस्पती बुद्धी, स्मृतीसाठी हितकर सांगितलेल्या आहेत. यातील काही वनस्पती मज्जाधातूचे पोषण करून बुद्धी-स्मृती वाढवितात, काही अतिरिक्‍त कफदोष व तमदोष दूर करून बुद्धी-स्मृतीची ताकद वाढवितात तर काही मनावर काम करून बुद्धी-स्मृती सुधारण्यासाठी उपयोगी असतात. प्रकृतीप्रमाणे आणि आवश्‍यकतेनुसार या द्रव्यांची योजना केली तर त्याचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
लहान वयात किंबहुना अगदी गर्भावस्थेतही मेंदू, मज्जाधातूची जडणघडण होत असते. बुद्धी, स्मृती, मन वगैरे सूक्ष्म भाव सर्वाधिक संस्कारक्षम असतात, तेव्हाच स्मृतिवर्धनाचे प्रयत्न करणे अधिक प्रभावी असते. त्या दृष्टीने गर्भवती स्त्रीने दुधातून शतावरी कल्प नियमित घेणे उत्तम असते. गर्भाचा जसजसा विकास होतो तसतसे लोणी, साजूक तूप घ्यायला सांगितले जाते. पंचामृतही नियमित घेण्याचा खूप फायदा होत असतो.
मूल जन्माला आल्यावर सुवर्णप्राशन संस्कार करायचा असतो, तोही स्मृतिवर्धनासाठी उत्तम असतो. सुवर्णाचे गुण असे सांगितले आहेत,
प्रज्ञावीर्यबलस्मृतिस्वरकरं कान्तिं विधत्ते तनोः ।
... चरक चिकित्सास्थान

सुवर्ण प्रज्ञा वाढवतो, वीर्य वाढवते, स्मरणशक्‍ती, ताकद, स्वर, कांती या सर्वांसाठी उपयुक्‍त असते.
याच्याच पुढे जाऊन नवजात बालकाला जन्मल्यानंतर लगेच आणि नंतर सहा महिने नियमितपणे सोने चाटवले तर ते एकपाठी होते. म्हणजे एकदा पाहिलेले, ऐकलेले, वाचलेले लक्षात ठेवणारे होते असेही सांगितलेले आहे.
मोठ्या वयातही सुवर्णवर्ख, सुवर्णसिद्धजल वगैरेंच्या माध्यमातून सुवर्णाचा अंश पोटात जाणे चांगले असते. बुद्धी, स्मृतिवर्धक सर्व रसायनांमध्ये सुवर्णाचा समावेश असतोच.
दीर्घमायुः स्मृतिं मेधामारोग्यं तरुणं वयः ।
...... चरक चिकित्सास्थान

म्हणजे रसायनामुळे दीर्घायुष्य, स्मरणशक्‍ती, आकलनशक्‍ती, आरोग्य व तरुण वय यांचा लाभ होतो असे सांगितलेले असल्याने स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी नियमित रसायन घेणे हाही एक उत्तम उपाय होय. च्यवनप्राश, धात्री रसायन, सारस्वतघृत वगैरे रसायने त्या दृष्टीने उत्तम होत. याशिवाय स्मरणशक्‍ती वाढवण्यासाठी उपयोगी पडणारे साधे योग याप्रमाणे सांगता येतील.

  • ज्येष्ठमध, वंशलोचन, पिंपळी, सैंधव, सुवर्णादि धातूंचे भस्म, वेखंड, मध, तूप, खडीसाखर या प्रत्येक पदार्थासह त्रिफळा सेवन केल्यास सर्व रोगांचा नाश होतो, स्मरणशक्‍ती, बुद्धी, आकलनशक्‍ती वाढते, आयुष्य वाढते. "सॅन रिलॅक्‍स सिरप', "ब्रह्मलीन सिरप' घेण्याचाही उपयोग होतो.
  • ब्राह्मीचा रस, दुधासह ज्येष्ठमधाचे चूर्ण, गुळवेलीचा रस, गूळ व फुलासह शंखपुष्पीचा रस हे चार योग पचनशक्‍तीचा विचार करून घेतले असता आयुष्य वाढते, धारणाशक्‍ती, आकलनशक्‍ती वाढते.
  • विदारी कंद, अतिबला, ज्येष्ठमध, आवळा, गुळवेल, ब्राह्मी, शंखपुष्पी, अश्‍वगंधा, शतावरी यातील मिळतील त्या वनस्पतींचे चूर्ण करून, त्याच्याच भावना देऊन तूप व मधासह सेवन केले किंवा या वनस्पतींचा संस्कार करून बनविलेले तूप सेवन केले तर त्यामुळे बुद्धी, मेधा वाढतात, ताकद वाढते.

eSakal

No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content