Maharashtra Times
पावसाळ्यात अनेक आजारांच्या साथी पसरतात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अशुद्ध पाणी. या काळात हमखास जाणवणारे काही
आजार आणि त्यावर घरच्या घरी करता येतील असे उपाय सांगताहेत, वैद्य रोहित बारटक्के
****************
सदीर्, खोकला, ताप : या काळात सर्वसाधारणपणे आढळून येणारे आजार म्हणजे सदीर्, खोकला, ताप. दम्याचा जोरही याच काळात वाढलेला असतो. मलेरिया, टॉयफॉइड, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू आणि साथीचे आजार पळवण्यासाठी पाणी नेहमी उकळून प्या. हळद घातलेलं दूध, चहापाती, मिरी घालून उकळवलेलं कंठण पिणंही फायद्याचं ठरतं. ताप आल्यावर शक्यतो लंघन करा. भूक लागल्यास भाताची पेज, मुगाची खिचडी असे पचायला हलके पदार्थ घ्या. हे पदार्थ ताजे आणि गरम गरम खावेत. दिवसा झोपणं टाळा. खूप थंडी वाजत असल्यास अंगाला वेखंड लावा.
मलेरिया डासामुळे तर टॉयफॉइड, कावीळ हे आजार दूषित पाण्यामुळे, लेप्टोस्पायरोसिस उंदरांच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्याने होतात. त्यामुळे पायाला जखम झाली असल्यास रस्त्यावर किंवा कुठेही साठलेल्या पाण्यातून जाऊ नये. अन्यथा जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.
गॅस्ट्रो : दूषित पाणी पिण्याने उलट्या, जुलाब होऊन डीहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. म्हणून बाहेरील पदार्थ खाऊ नका. कारण बाहेरच्या पदार्थांवर माशा बसलेल्या असतात. जंतूसंसर्ग होऊन जुलाब आणि उलट्या झाल्यामुळे शरीरारातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन त्याचा परिणाम किडनीवरही होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे मीठ आणि साखर घातलेलं पाणी थोड्या थोड्या वेळाने पित राहा. इलेक्ट्रॉल पावडरही उपयुक्त आहे.
घसा दुखत असल्यास गरम पाण्यात मीठ किंवा हळद घालून त्या पाण्याने गुळण्या करा.
सांधेदुखी : या ऋतूत हवामान गार असल्यामुळे वात प्रकृतीचे अनेक त्रास सतावू लागतात. सांधेदुखी, सांधे जखडणे, सांधे करकर वाजणे, सूज येणं, कंबर दुखणं अशा अनेक समस्या उद्भवतात. या आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी नियमित कोमट पाणी पिणं, सांधे शेकणं, अभ्यंग स्नान करणं. दालचिनी उगाळून त्याचा लेप सुजलेल्या सांध्यांवर लावता येईल. आलं चेचून त्याचाही लेप लावता येईल. आणखी एक उपाय म्हणजे कडुलिंब, रुई, एरंड, निरगुंडी, शेवग्याची पानं वाफवून घ्या. गुडघ्याला तेल लावा आणि त्यावर ही वाफवलेली पानं बांधून ठेवा. यामुळे पायांना आराम पडेल.
केस गळणं : वात वाढल्याने केस गळण्याची समस्या उद्भवते. तसंच पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळेही केस गळतात. म्हणून पावसात भिजू नका. केस कोरडे राहतील, याची काळजी घ्या. केसांना नियमित तेल लावा. गरम दूध प्या. बटाटा, वांग, रताळं यासारखे वातुळ पदार्थ खाऊ नका.
पित्त : दूषित अन्नपदार्थ/ पाण्यामुळे काही जणांना पित्त उठतं. असं झाल्यास आवाळा, हरडा, बेहडा यांचं मिश्रण रात्री झोपताना घ्या. जेणे करून शौचाद्वारे पित्त बाहेर पडेल.
जंतकृमी : दूषित अन्न, पाणी, पालेभाज्या यामुळे कृमी होण्याची शक्यता वाढते. वारेवार सदीर्, खोकला, ताप, जुलाब, भूक कमी होणं, पोटदुखी, त्वचाविकार, चेहऱ्यावर पांढरे डाग, ही कृमी झाल्याची लक्षणं आहेत. यासाठी १५ दिवस रात्री झोपताना दुधातून मोठ्यांनी ४ तर लहानांनी २ चमचे एरंड तेल घ्या.
हे लक्षात ठेवा
गहू, जव, मूग, यव अशी जुनी धान्यं सैंधव मीठ आणि पंचकोल (पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ) यांच्यासह खा. पावसाळ्यात ताजे आणि पचायला हलके अन्नपदार्थ खा. मधून मधून मध खा. स्वच्छ कपडे घाला. सर्वांगाला तेल लावून शेक घेऊन गरम पाण्याने स्नान करा. आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.
हे टाळा
> दिवसा झोपणं
> पावसात भिजणं
> अति व्यायाम
> भूक मंदावत असल्याने तिखट तेलकट पदार्थ खाणं
No comments:
Post a Comment