Search This Blog

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध शुक्रधातूची शक्‍ती वाढवते. तसेच ते डोळ्यांसाठी हितकारक, स्वर व कांती उत्तम करणारे असून व्रण शुद्ध करून जखम भरून आणण्यास मदत करते. रक्‍तपित्त म्हणजे शरीरातील कुठूनही होणारा रक्‍तस्राव थांबवते. अशा या बहुगुणी वनस्पतीची माहिती.. .......ज्येष्ठमध हे बहुतेकांच्या परिचयातले द्रव्य असेल. घरगुती औषधांप्रमाणेच आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरले जाणारे हे महत्त्वाचे द्रव्य आहे. ज्येष्ठमधाचे झुडूप एक ते दीड मीटर उंचीचे असते. पाने लहान आणि सहा ते सात जोड्यात असतात. फुले गुलाबीसर रंगाची असून वसंत ऋतूत फुलतात. औषधात ज्येष्ठमधाचे मूळ वापरले जाते. ज्येष्ठमधाला संस्कृतमध्ये मधुयष्टी म्हणतात. याशिवाय याला मधुवल्ली, मधुस्रवा, मधुक, यष्टी, यष्टाह्वा वगैरे पर्यायी नावे आहेत. अरब, इराण, अफगाणिस्तान, चीनमध्ये ज्येष्ठमध विशेषत्वाने होतो. आजकाल पंजाब, सिंध, पेशावर वगैरे ठिकाणीही याची लागवड केली जाते. मधुकं रक्‍तपित्तघ्नं व्रणशोधनरोपणम्‌ । गुरु स्वादु हिमं वृष्यं चक्षुष्यं स्वरवर्णकृत्‌।। ... भावप्रकाश ज्येष्ठमध नावाप्रमाणेच मधुर रसात ज्येष्ठ व श्रेष्ठ असते. हे शीत वीर्याचे आणि मधुर विपाकी असते. गुणाने स्निग्ध व गुरू असते. शुक्रधातूची शक्‍ती वाढवते. डोळ्यांसाठी हितकारक, स्वर व कांती उत्तम करणारे असून व्रण शुद्ध करून जखम भरून आणण्यास मदत करते. रक्‍तपित्त म्हणजे शरीरातील कुठूनही होणारा रक्‍तस्राव थांबवते. ज्येष्ठमध हे शुक्रधातू व ओजतत्त्व वाढवणारे असल्याने ताकद येते, विशेषतः वात व पित्त वाढल्यामुळे आलेल्या अशक्‍ततेमध्ये ज्येष्ठमधाचे चूर्ण तुपासह घेण्याचा उपयोग होतो. ज्येष्ठमधाचा लेप लावण्याने अंगकांती सुधारत असल्याने बहुतेक उटण्यात, फेस पॅकमध्ये याचा अंतर्भाव असतो. ज्येष्ठमध रक्‍त शुद्ध करत असल्याने पोटात घेण्यानेही वर्ण उजळण्यास मदत करतो. पित्त वाढल्यामुळे उलट्या होत असल्यास, पोटात, छातीत व घशात जळजळ होत असल्यास, ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास आराम पडतो. मूत्रप्रवृत्तीच्या वेळेस दाह होत असल्यास, ज्येष्ठमधाचा हिम (ज्येष्ठमधाचे चूर्ण पाण्यात भिजवून, गाळून) पिण्याचा उपयोग होतो. हा हिम पिण्याने अंगातली एकंदर उष्णताही कमी व्हायला मदत मिळते. उष्णतेमुळे तोंडाला वारंवार चरे पडत असतील, तोंड येत असेल तर ज्येष्ठमधाच्या काढ्यात तूप घालून त्याचा गंडूष (८-१० मिनिटे काढा चुळीप्रमाणे तोंडात धरून ठेवणे) केल्याचा फायदा होतो. आवाज बसला असता ज्येष्ठमधाचे मूळ तोंडात धरून त्याचा रस हळूहळू चोखावा. या प्रयोगाने स्वर सुधारण्यासही मदत मिळते. विशेषतः गायकांनी, सतत बोलावे लागणाऱ्यांनी याप्रकारे अधून मधून ज्येष्ठमधाचा रस चोखणे चांगले. शौचाला साफ होत नसेल, मूळव्याधीतून रक्‍त पडत असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी ज्येष्ठमधाचे चूर्ण व सितोपलादि चूर्ण यांचे मिश्रण तूप व मधासह वारंवार चाटल्यास खोकला सुटायला व छाती मोकळी व्हायला मदत मिळते. वारंवार कोरडा खोकला लागत असल्यास ज्येष्ठमधाची मुळी चोखण्याचा फायदा होतो. अंगावर बारीक पुळ्या येत असतील, विशेषतः त्या ठिकाणी आग होत असेल, त्वचा लालसर होत असली तर ज्येष्ठमध तूपासह उगाळून तयार केलेला लेप लावण्याने फायदा होतो. डोळ्यांवर ताण आल्याने डोळे दुखत असतील, प्रखर प्रकाशाकडे फार वेळ बघितल्यामुळे जळत असतील, लाल झाले असतील तर ज्येष्ठमध पाण्यात उगाळून केलेल्या गंधाचा पापण्यांवर व डोळ्याच्या आजूबाजूला लेप केल्यास बरे वाटते. ज्येष्ठमधाबरोबर सिद्ध केलेले तूप जखमेवर लावले असता जखम सहज भरून येते. शस्त्राच्या घावानंतर होणाऱ्या तीव्र वेदना कमी होण्यासाठी ज्येष्ठमधाचे चूर्ण कोमट तुपात मिसळून लेप करायला सांगितला आहे. ज्येष्ठमध केसांसाठीही उत्तम असते. त्यामुळे बहुतेक आयुर्वेदिक केश्‍य तेले बनवताना याचा उपयोग केलेला असतो. ज्येष्ठमध जसे पोट साफ होण्यासाठी वापरता येते, तसेच ते अधिक मात्रेत घेतल्यास वमनासाठी म्हणजे उलटीद्वारे दोष बाहेर काढून टाकण्यासाठी उपयुक्‍त असतो. वमनासाठी बहुतेक वेळा ज्येष्ठमधाचा काढा वापरण्याचा प्रघात आहे.

2 comments:

Anonymous said...

I wonder what is the difference between Jyeshthamadh powder and churna, is it the same?

Anonymous said...

मधुमेहीसाठी ज्येषठमध कसे आहे

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content