Search This Blog

आयुर्वेद - मुलभूत माहिती


आयुर्वेद आणि त्यासारख्या संग्रहामधून भारतात प्राचीन काळापासून असलेले वैद्यकीय ज्ञान मिळते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, आहाराविषयक वगैरे नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तिला वाढविण्यावर भर दिला जातो.


आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या वेदामधून घेतले आहेत आणि त्यामुळे आयुर्वेद हा वेदाचा एक घटक समजला जातो. समुद्रमंथनातून निघालेले भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदातील परंपरेनुसार आद्य वैद्य मानले जातात. आयुर्वेदात मूलतः दैवी आणि मानुषी अशा दोन परंपरा आहेत. मानुषी परंपरेत चरक संहिता, सुश्रुत संहिता, काश्यप संहिता ह्या तीन संहितांमध्ये तीन वेगवेगळ्या परंपरा वर्णन केलेल्या आहेत. त्यापैकी महर्षि चरक आणि महर्षि सुश्रुत यांनी प्रत्येकी एका परंपरेची स्थापना केली आणि त्यानंतर अनेक वर्षे त्यांच्या शिष्यगणांनी हे ज्ञान आत्मसात करून वाढविले.


आयुर्वेदातील या विविध परंपरांनी सुमारे बाराशे वर्षांचा काळ व्यापलेला आहे. चरक आणि सुश्रुत संहितांचे बर्‍याच लोकांनी संपादन केले आहे आणि अनेक शतकांनंतर त्यांच्यामध्ये अगणित आवर्तने झाली आहेत. आयुर्वेदामध्ये शल्यचिकित्सेचीही परंपरा आहे, जिची सुरूवात सुश्रुताने केली.


इसवीसनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतात राहणार्‍या वाग्भट यांनी सुरुवातीच्या आयुर्वेदीक साहित्यांचे संश्लेषण केले ज्याला अष्टांग संहिता असे म्हणतात. चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांचे काम आयुर्वेदाचा मूळाधार समजले जाते आणि या तिघांना आदराने वृद्ध त्रयी , बृहद त्रयी या नावांनी ओळखले जाते. त्यानंतर आठव्या शतकात वैद्य माधव ऋषि यांनी निदान ग्रंथ हा ग्रंथ लिहिला जो थोड्याच काळात प्रमाण बनला.


आयुर्वेदात मुख्यतः वनस्पती, कंदमुळे यांच्यापासून तयार झालेली औषधे वापरतात. पहिल्या सहस्त्रकानंतर रासायनिक औषधेही थोड्याप्रमाणात वापरली जाऊ लागली. आठव्या शतकात उग्रादित्य आणि चौदाव्या शतकात सरनगध्र यांनी बर्‍याच रासायनिक औषधांचा अभ्यास केला.
मार्गदर्शक आणि मूळ तत्वे
पंचमहाभूते
प्राचीन सांख्यदर्शन या दर्शनशास्त्रावर आयुर्वेद आधारलेले आहे ज्यात सर्व भौतिक जग हे पाच मूळ तत्वांपासून तयार झाले आहे असे मानले जाते. यातील प्रत्येक मूळतत्वाचे स्वत:चे काही गुण आहेत. ही मूळतत्वे खालील प्रमाणे आहेत.

  1. आकाश
  2. वायू
  3. अग्नी
  4. आप
  5. पृथ्वी
  6. दोष


सर्व शारिरीक प्रक्रिया तीन दोषांच्या संतुलनातून नियंत्रित केल्या जातात.
वात दोष
वात शरीर आणि मनाची हालचाल नियंत्रित करतो. जास्त वातामुळे काळजी, निद्रानाश, बद्धकोष्ठता, इत्यादी त्रास होतात. वात रक्त पुरवठा, श्वासोच्छवास, मनातील विचार इत्यादि गोष्टींवर नियंत्रण ठेवतो. वातामुळे मज्जासंस्था, श्रवण, वाणी कार्यान्वित होतात. वातामुळे उत्साह आणि सर्जनक्षमता वाढतात. वाताचा पित्त आणि कफ यांच्यावरही परिणाम होतो. बर्‍याचवेळा वातदोष हे रोगाचे पहिले कारण असते. वाताला वायू असेही म्हणतात.
कफ दोष
कफ आपतत्वापासून बनतो असे मानले जाते. कफामुळे शरीरातील मूलद्रव्यांना मूर्त स्वरूप मिळते, प्रतिकार शक्ती वाढते. कफ सांध्यामधील स्नेहक, जखम भरणे, ताकद, संतुलन, स्मरणशक्ती, हृदय व फुप्फुसे यांना नियंत्रित करतो. कफामुळे आपुलकी, प्रेम, शांतता हाव, मत्सर हे गुण मिळतात. अतिकफामुळे स्थूलता, सुस्ती आणि ऍलर्जि इत्यादि त्रास होतात.
पित्त दोष
पित्ताची निर्मिती आप आणि अग्नि या तत्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्न पचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ, इत्यादी त्रास होतात. संतुलित पित्ताने नेतृत्व गुण विकसित होतात.


No comments:

ScienceDaily: Health & Medicine News

ScienceDaily: Alternative Medicine News

आहार व आरोग्य

NCCAM Featured Content